
कोल्हापूर, त. २४ : गांधीनगरसह १३ गावांसाठी नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होऊन तीन वर्षे झाले. एकूण कामापैकी ५० टक्के इतकेच काम झाले आहे. जिथे उकरले तिथे रस्ते केले नाहीत. पाण्याची कनेक्शन दिली नाहीत. सगळी कामे अर्धवट का करता? या योजनांच्या कामाचे वेळापत्रक करा आणि त्या वेळेतच काम पूर्ण झाले पाहिजे. असे खडे बोल आमदार अमोल महाडिक यांनी गांधीनगर नवी नळ पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारांना सुनावले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ही बैठक झाली.
या बैठकीला कार्यकारी अभियंता मनीष पवार यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अमल महाडिक म्हणाले, ही योजना २०२२ मध्ये सुरू झाली. आत्तापर्यंत पन्नास टक्के काम तरी झाले आहे का? ४२३ किलोमीटर जलवाहिनी टाकायचे काम होते. त्यातील २०९ किलोमीटर झाले. कामाचा वेग वाढला पाहिजे. जलवाहिनीसाठी रस्ते उकरता पण परत रस्ते करत नाही. तुम्हाला रेस्टोरेशनसाठी ५० कोटी निधी आहे. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम कामही वेळेत झाले पाहिजे. काही ठिकाणी नव्या वसाहती होत आहेत त्यांचाही विचार करण्याची गरज आहे. जागा बदलल्याने जिथे डिझाईन बदलणार आहे ते तात्काळ करा. कोणत्या परवानगी लागणार आहे ते सांगा आम्ही त्या मिळवून देतो. योजनेचे वेळापत्रक बनवा. त्या वेळेत काम पूर्ण झालेच पाहिजे.
प्रोजेक्ट मॅनेजर ना बोलवा.
यावेळी अमल महाडिक म्हणाले, पुढची बैठक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, आणि ठेकेदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याबरोबर आयोजित करा. त्यांना मी दिरंगाईचा अहवाल देणार आहे.”
आमदारांनी दिले निर्देश
- योजनेच्या कामाचा रोज आढावा घ्या.
- दर पंधरा दिवसांनी माझ्यासोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करायची.
- महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आढावा बैठक.
- वेळापत्रकानुसार त्या दिवशी तेवढे काम पूर्ण झाले पाहिजे.
– आवश्यक असणाऱ्या परवानगी आठ दिवसात मिळवा.
रस्ते पुनर्निर्माण नाही