
कोल्हापूर : जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारसंघ निश्चितीची प्रक्रिया सुरू असून, येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर केवळ एक-दोन महिन्यांतच जिल्ह्यातील 456 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाही होणार असल्याने, ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असल्यामुळे त्याआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ग्रामपंचायत प्रभाग रचना सुरू होणार असून, जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, गाव पातळीवर सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांसह स्थानिक गट-तटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधी होणार असल्यामुळे अनेकांचे ग्रामपंचायत निवडणुकीचे गणित सोपे होणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 1,026 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची सोडत नुकतीच जाहीर झाली असून, त्यात सुमारे 124 गावांमध्ये यापूर्वीच्या सोडतीत बदल झालेला आहे. त्यामुळे आरक्षण बदललेल्या गावांमध्ये नव्याने फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी सरपंचपद पूर्वीप्रमाणेच कायम राहिले आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यापासून ते पॅनल उभारणीपर्यंत अनेक गावांत चर्चांना जोर आला आहे.
एकंदरीतच येत्या तीन-चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असून, राजकीय आखाडे आता गावपातळीवर उतरू लागले आहेत.