
कुपवाड : येथील संजय औद्योगिक वसाहतीतील इंडोटेक्स एक्स्पोर्ट कंपनीच्या संचालिका ममता बाफना यांची तब्बल 19 लाख 64 हजार 401 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील एका व्यावसायिकावर कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सागर नारायणदास केसवाणी (वय 35, रा. उल्हासनगर, ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तो उल्हासनगरमधील चिराग प्रेल्स या फर्मचा संचालक आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बाफना यांच्या इंडोटेक्स एक्स्पोर्ट या जीन्स कापड उत्पादन करणाऱ्या कंपनीतून सागर केसवाणी याने 27 जानेवारी 2023 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत तयार जीन्स कापडाची ऑर्डर दिली होती. माल उल्हासनगर येथे पोहचवण्यात आला.
एकूण व्यवहार 27 लाख 29 हजार 862 रुपयांचा असतानाही, संशयिताने केवळ 7 लाख 65 हजार 461 रुपये अदा केले. उर्वरित 19 लाख 64 हजार 401 रुपये पुढे देतो असे सांगून केसवाणी यांनी वेळकाढूपणा करत बाफना यांची फसवणूक केली.
रक्कम परत मागूनही ती दिली न गेल्याने अखेर ममता बाफना यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात सागर केसवाणी याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.