
सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त करून चालक व मंडळावर गुन्हा दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी दिला आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यात आयोजित डीजे चालकांच्या बैठकीत त्या मार्गदर्शन करत होत्या.
या बैठकीला सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे सुधीर भालेराव, संजयनगरचे सूरज बिजली आणि वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी डीजे चालकांना ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डीजे, साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असून, नियमभंग झाल्यास बीभत्स गाणी वाजवणे, धार्मिक भावना दुखावणे, वयोवृद्ध, गर्भवती महिला व लहान मुलांना त्रास होईल असा आवाज टाळावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले. नियम न पाळल्यास मंडळ पदाधिकारी, डीजे मालक व ऑपरेटरवर गुन्हे दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
बैठकीत उपस्थित डीजे चालकांनी सर्व नियम पाळण्याचे आश्वासन दिले.