
कागल : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक महत्त्वाचे आणि वादग्रस्त विधान करत सांगितले की, मी पुढेमागे मुख्यमंत्री झालो, तर प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सध्याच्या अनुदानाच्या दुप्पट रक्कम देईन.
कागल तालुक्यातील वंदूर येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कर्जमाफी झाल्यावर अनेक शेतकरी कर्ज फेडतच नाहीत, त्यामुळे सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत येतात. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे सहकारी संस्थांचे तब्बल ३८ हजार कोटी रुपये थकीत असल्याचे ऐकण्यात आले आहे, असे उदाहरणही त्यांनी दिले.
तसेच, राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा ४६ हजार कोटी खर्च असल्याने सध्या आर्थिक मर्यादा असल्याचे सांगत, काही पुरुषांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याची टीका त्यांनी केली.
मुश्रीफ म्हणाले, फक्त कर्जमाफी करत राहिल्याने शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची सवय लागत नाही. त्यामुळे जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज फेडतात, त्यांना मोठं बक्षीस द्यायला हवं.. मी मुख्यमंत्री झालो, तर त्यांना एक लाख रुपयांचे अनुदान देईन.
त्यांच्या या विधानामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात नव्या चर्चांना आणि संभाव्य वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.