
कुपवाड : सांगली जिल्ह्याचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये सांगली पॅटर्न म्हणून राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील उलथापालथीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच इच्छुक उमेदवार सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या कुपवाडमध्ये एक नाव विशेष चर्चेत आहे. सनी धोतरे. कमी वयात स्वतःचा ठसा उमटवणारे, काँग्रेस पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आणि कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून ओळख निर्माण केलेले सनी धोतरे हे प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मनपा क्षेत्रात प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.
राजकीय घडामोडींचा सूक्ष्म वेध घेत सनी धोतरे हे हल्ली आपल्या राजकीय भवितव्याचा गांभीर्याने विचार करत आहेत. महाविकास आघाडीच्या धर्तीवरच काँग्रेस पक्षात त्यांना मिळणाऱ्या न्यायाची मर्यादा ओळखून ते नव्या राजकीय वळणावर उभे आहेत. काँग्रेसमध्ये कार्यक्षम असूनही मागे पडण्याची भीती, स्थानिक नेतृत्वाकडून होणारी उपेक्षा आणि विकासाच्या व्यापक दृष्टीकोनातून प्रभावी प्लॅटफॉर्मची गरज या सगळ्याचा विचार करता, सनी धोतरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या जोरात रंगल्या आहेत.
सनी धोतरे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यात आपलं योगदान सातत्याने दिलं आहे. गोरगरीबांना मदत, तरुणांना दिशा, सार्वजनिक समस्यांवर आवाज आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष ही त्यांची खरी ओळख. हेच कार्य जर एका संघटित, सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून पुढे नेलं गेलं तर त्याचा फायदा केवळ सनी धोतरे यांना नव्हे, तर संपूर्ण कुपवाड शहराला होणार आहे.
या राजकीय प्रवेशासाठी भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे पुढाकार घेत असून, सनी धोतरे यांना मनपा निवडणुकीत योग्य न्याय मिळावा यासाठी पक्षपातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. पक्षाच्या धोरणांशी सुसंगत सामाजिक दृष्टिकोन असलेले सनी धोतरे हे भाजपसाठी नवा चेहरा असतील आणि त्यांच्यामार्फत भाजपला नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल.
जर सनी धोतरे यांनी थेट काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला, तर कुपवाडमधील महाविकास आघाडीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होणार हे निश्चित. विशेषतः काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना यामुळे मोठा धक्का बसेल. या निर्णयामुळे कुपवाड शहरात नवी राजकीय ऊर्जा, नव्या विचारांची मांडणी आणि नव्या नेतृत्वाची ताकद तयार होणार आहे.
राजकारणात काही निर्णय हे स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी अत्यावश्यक असतात. सनी धोतरे यांचा हा संभाव्य निर्णय त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे आणि दीर्घदृष्टीचे द्योतक आहे. जर ते भाजपमध्ये सामील झाले, तर कुपवाड शहराच्या राजकारणाला नवे वळण मिळेल, हे निश्चित!