
शिरोळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनतारा संस्थेत रवानगी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात भाविकांमध्ये तीव्र जनआक्रोश उसळला आहे. महादेवी परत नांदणी मठात यावी, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी, मठाधिपती आणि भाविक प्रयत्न करत आहेत.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल 2 लाख 4 हजार 421 भाविकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून महादेवी हत्तीणीसाठी आपली कळकळ व्यक्त केली. या सर्व स्वाक्षरी फॉर्मचे पूजन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते नांदणी येथे करण्यात आले. या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, वनताराचे सीईओ कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने आणि मठाधिपती यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. हत्ती परत आणण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागणार असून, त्यासाठी लवकरच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री आबिटकर यांनी दिली.
वनताराच्या सीईओंनी या चर्चेत स्पष्ट केले की, नांदणी मठाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास वनतारा संस्थेमार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. मात्र, जर न्यायालयाकडून निर्देश आले, तर त्यानुसारच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी कोल्हापुरात उभा राहिलेला हा जनसागर आता न्यायालयीन लढाईच्या दिशेने वळला असून, भाविकांच्या श्रद्धेच्या विजयासाठी आता कायद्याच्या चौकटीतून अंतिम प्रयत्न सुरु झाले आहेत.