
सांगली : अमेरिकेने भारतीय निर्यातीवर २५ टक्के आयात शुल्क लावल्याने मिरज व कुपवाड औद्योगिक वसाहतींतील उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सतीश मालू यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे फक्त उद्योगांवरच नव्हे, तर हजारो कामगारांच्या रोजगारावरही संकट ओढवण्याची शक्यता आहे.
मालू यांनी सांगितले की, कुपवाड व मिरज औद्योगिक वसाहतींतील सुमारे १५ कारखान्यांतून अमेरिकेला थेट निर्यात केली जाते. या व्यवसायाचे मूल्य सुमारे ६०० कोटींवर आहे. शिवाय, ५० हून अधिक कारखान्यांतून तयार होणाऱ्या सुटे भागांमुळे एकूण १५०० कोटींच्या उलाढालीवर याचा थेट व अप्रत्यक्ष परिणाम होईल. विशेषतः वस्त्रोद्योग, फौंड्री, रबर व वाहन क्षेत्रातील उत्पादनांना सर्वाधिक फटका बसणार आहे.
या उद्योगांमध्ये सध्या चार हजारांहून अधिक कामगार कार्यरत असून, नफ्याचे प्रमाण कमी असलेल्या या व्यवसायांवर आयात शुल्कवाढीमुळे मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. अमेरिका सध्या भारतावर २५ टक्के शुल्क आकारत असली तरी पाकिस्तान व बांगलादेशवर केवळ १९ टक्के शुल्क आहे. त्यामुळे अमेरिकन आयातदारांनी शेजारी देशांतील स्वस्त मालाला प्राधान्य दिल्यास भारतीय निर्यात मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मालू यांनी सुचवले की, केंद्र शासनाने यावर त्वरित उपाययोजना करत निर्यात अनुदान देणे आवश्यक आहे, जेणेकरून उद्योजकांचा आर्थिक भार काहीसा हलका होईल. दरम्यान, केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पुढील धोरण ठरवण्यासाठी आठवडाभर परिस्थितीचे निरीक्षण करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, वाढीव टेरीफमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात सध्या अस्वस्थता व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.