
अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आज शिक्षणमंत्री दादाजी भुसे व प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासोबत झालेल्या चर्चेत संघटनेच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले. नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी विशेष समितीकडे वर्ग करणे, विनाचौकशी अटक टाळणे, निलंबित अधिकाऱ्यांची पुनर्स्थापना आणि अतिरिक्त कामांचा ताण कमी करण्याबाबत चर्चा झाली. सरकारने कोणत्याही निरपराध अधिकाऱ्यावर चुकीची कारवाई होणार नाही, तसेच सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याने 8 ऑगस्टपासून सुरू असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्या 13 ऑगस्टपासून पूर्ववत कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.