
सांगली : शहराच्या राजकारणात मोठे बदल घडवणारी घटना आज मुंबईत घडली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सह्याद्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पृथ्वीराज पाटील व आमदार सुधीर गाडगीळ हे सांगलीला ‘स्मार्ट सिटी’ बनवतील. भाजपकडे विकासाची दृष्टी आणि धोरण असल्याने या सर्वांच्या नेतृत्वाखाली सांगलीचा वेगवान विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर आपल्या पंचसुत्री विकास आराखड्याची माहिती दिली. यात सांगलीला थेट चांदोलीतून शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा, ॲग्रोटेक हब म्हणून विकास, कवलापूर विमानतळाला मान्यता, कृष्णाकाठचा पर्यटन विकास, विस्तारीत सांगलीचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे, महिला सुरक्षेच्या व्यवस्था बळकट करणे आणि महापुरापासून बचावासाठी योजना राबवणे या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यांवर सहमती दर्शवून विकासासाठी पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही दिली. विशेषतः थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पृथ्वीराज पाटील यांनी यापूर्वी भाजप प्रवेशाबाबत झालेल्या चर्चेचा उल्लेख करत, तो निर्णय आधी घेतला असता तर आज मी आमदार असतो, असा गौप्यस्फोट केला.
या प्रवेशामुळे सांगलीच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, भाजपच्या संघटनेला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.