
कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचे स्वप्नवत असलेले उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आज शाही सोहळ्यात साकार होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ना. भूषण गवई यांच्या शुभहस्ते आज दुपारी ३.३० वाजता भाऊसिंगजी रोडवरील न्यायालय इमारतीत कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मेरी वेदर ग्राऊंड येथे उद्घाटनाचा जाहीर सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक अध्यक्षस्थान भूषविणार असून, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख व न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर हेही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांचे आगमन शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजता कोल्हापूर विमानतळावर झाले. विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार शाहू महाराज, मंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. विनय कोरे, आ. अमल महाडिक, आ. अशोकराव माने, आ. राहुल आवाडे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
विमानतळावरून शहराकडे रवाना होताना उजळाईवाडी परिसरात उचगाव, कणेरी, गोकुळ शिरगाव, तामगाव, नेर्ली, सरनोबतवाडी आदी गावांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहन ताफ्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. सरन्यायाधीश गवई यांनीही काचा खाली करून नागरिकांना नमस्कार करत प्रेमळ स्वागताचा स्वीकार केला. कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांसाठी हा सुवर्णदिन ठरणार आहे.