
सांगली : संभाव्य पूरस्थितीत सर्वाधिक बाधित होणाऱ्या सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट व इनामदार मळा भागाला आमदार सुधीर गाडगीळ आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. या भेटीवेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अप्पर तहसीलदार अश्विनी वरूटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे यांनी प्रशासन सज्ज असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन केले. नागरिकांनी स्थलांतरासाठी सामानाची बांधाबांध सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज दुपारी 3 वाजता कोयना धरणातून 80,500 क्युसेक तर सायंकाळी 4 वाजता वारणा धरणातून 36,630 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वाढत्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी उद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. साधारण 30 फूटांवर सूर्यवंशी प्लॉट तर 32 फूटांवर इनामदार प्लॉट पाण्याखाली जातो.
प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या सूचनांचा योग्य तो प्रसार करून नागरिकांना सतर्क करावे, मात्र अनावश्यक भीती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले.