
सांगली : कोयना धरणातील वाढता विसर्ग आणि सततचा पाऊस यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फुटांपर्यंत जाण्याची शक्यता असून, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करावे लागू शकते. अशा वेळी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सोबत असेल, असा दिलासा भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिला.
श्री. पाटील यांनी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट आदी पूरप्रवण भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. फाउंडेशनतर्फे मदतीसाठी टीम सज्ज असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांना घाबरू नये, सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले. २०१९ व २०२१ प्रमाणे मदत पोहोचवण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भेटीवेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.