
सांगली : कवठेमहांकाळ येथे खरेदी केलेल्या जुन्या गुंठेवारी जमिनीचे नियमितीकरण प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या मंडळ अधिकारी व कोतवालाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज दुपारी रंगेहात पकडले.
मंडळ अधिकारी मारुती विलास खोत (वय ४८) व कोतवाल संजय किसन हारगे (वय ४५, दोघे रा. विठूरायाचीवाडी) अशी आरोपींची नावे असून, या दोघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तक्रारदाराच्या आईसह परिसरातील काही नागरिकांनी खरेदी केलेल्या जुन्या गुंठेवारी जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज दिला होता. या अर्जांची चौकशी, पंचनामा व अभिप्राय देऊन प्रस्ताव पाठवण्यासाठी खोत व हारगे यांनी प्रत्येकी ७ हजार रुपये दराने पाच प्रस्तावांसाठी ३५ हजारांची लाच मागितली. तडजोडीनंतर २५ हजार रुपयांवर सौदा ठरला.
तक्रारदाराने याबाबत सांगली लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. पडताळणीदरम्यान खोत यांनी तक्रारदारास हारगे यांना भेटण्यास सांगितले. त्यावेळी हारगे यांनी प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी लाच मागणीची पुनरावृत्ती केली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत २५ हजारांची लाच घेताना हारगे यांना रंगेहात पकडले व दोघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई उपअधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, सीमा माने व वीणा जाधव यांच्या पथकाने केली.