
कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने आज झालेल्या पत्रकार परिषदेत गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी आपली स्पष्ट व ठाम भूमिका मांडली.
महाडिक यांनी सांगितले की, ही सभा सन 2024-25 च्या आर्थिक वर्षातील कारभारावर आहे. काही मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत; मात्र महायुतीचे अध्यक्ष असल्यामुळे अध्यक्षांकडून नक्कीच सहकार्याची अपेक्षा आहे.
त्यांनी चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्याविषयी कुटुंबीयांसारखी भावना व्यक्त करत, त्यांच्या कारभारात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र जाहिरातींच्या कोट्यवधींच्या खर्चावरील अनियमितता, संचालक मंडळाचा वाढता खर्च, तसेच संचालक संख्या वाढवून संघावर होणारा आर्थिक बोजा यावर त्यांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या जाहिरातीला 56 हजार खर्च येतो, त्यासाठी 2 लाखांचे बिल निघते; याची सर्व बिलं आणि ओरिजनल कोटेशन्स माझ्याकडे आहेत. अशा गोष्टींना विरोध म्हणजे युतीधर्माला विरोध नाही, असे त्या म्हणाल्या.
संचालक मंडळाच्या बैठका व प्रशिक्षणावर खर्चात झालेली झपाट्याने वाढही त्यांनी दाखवून दिली. 2021 पूर्वी 3 लाखांच्या तरतुदीत 2 लाखांचा प्रत्यक्ष खर्च व्हायचा; आज तो 13 लाखांवर पोहोचला आहे. संचालक प्रशिक्षणावरही 20 लाखांवरून 55 लाख खर्च जातोय. मग पुन्हा संचालक संख्या वाढवून संघावर बोजा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच वार्षिक अहवालात भाजप आमदार-खासदारांचे फोटो वगळल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकं असूनही आम्ही उद्या युतीधर्म पाळून विरोध न करण्याची भूमिका घेत आहोत; मात्र इथून पुढे या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाडिक यांनी स्पष्ट केले की, चेअरमन अजून नवीन आहेत, मागील त्रुटींसाठी त्यांना वेठीस धरणार नाही. सभा शांततेत पार पडेल याची काळजी घेऊ; पण चुकीच्या कारभारात सुधारणा होत नाही तोपर्यंत व्यासपीठावर बसणार नाही. सभासद हिताच्या बाबतीत कसलीही तडजोड होणार नाही.
त्यांच्या या भूमिकेमुळे गोकुळ दूध संघाच्या सभासद व स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.