
मिरज : मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद सण मिरज शहरात उद्या उत्साहात साजरा होणार असून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश जारी केले आहेत.
त्याअन्वये उद्या सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत मिरज शहरातील स्टेशन चौक ते मिरासो दर्गा, मिरज मार्केट, महाराणा प्रताप चौक मार्गे बॉम्बे बेकरीपर्यंतचा तसेच शास्त्री चौक ते जवाहर चौक, किसान चौक, मटन मार्केट, भंडारी बाबा दर्गा – पारकट्टा, गुरुवार पेठ, मिरासो दर्गा मार्गावरील सर्व जोडरस्त्यांसह वाहतूक बंद राहणार आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे. टाकळी, बोलवाड, सुभाषनगरकडून येणारी व जाणारी वाहने स्टेशन चौक – फुले चौक – शास्त्री चौक – मंडले पेट्रोल पंप – वखारभाग – गाडवे चौक मार्गे प्रवास करू शकतील. तसेच मिरज शहरातून मालगाव, सुभाषनगरकडे जाणारी वाहने महात्मा गांधी चौक – इसापुरे हॉस्पिटल कॉर्नर – कर्मवीर चौक – ओ २ पार्क – आळतेकर हॉल मार्गे जाऊ शकतील. म्हैशाळ, आरग व बेडगकडून येणारी वाहने म्हैशाळ रोड नविन ब्रिज – शास्त्री चौक – महात्मा फुले चौक एसटी स्टॅण्ड मार्गे प्रवास करू शकतील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी सांगितले आहे.