
सांगली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या उत्पादनांवर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावल्याने सांगली जिल्ह्यातील उद्योगांवर गंभीर संकट ओढावले आहे. या निर्णयामुळे ५०० ते ७५० कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता असून, अनेक निर्यातक्षम उद्योग अडचणीत येतील तसेच रोजगार घटण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
टॅरिफवरील भारत-अमेरिका चर्चेला तूर्तास स्थगिती मिळाल्याने उद्योगांना तातडीने पर्याय शोधावे लागत आहेत. अन्य देशांतील बाजारपेठा मिळविणे, मुक्त व्यापार करार किंवा उद्योगविश्वाला विशेष पॅकेज देण्याचा विचार सुरू असला तरी, ही प्रक्रिया कठीण व वेळखाऊ असल्याने सध्याचे नुकसान रोखणे अवघड ठरत आहे.
मोदी व ट्रम्प सरकारने टोकाची भूमिका न घेता हा मुद्दा तातडीने सोडवावा, अन्यथा औद्योगिक विस्कळीतपणा व बेरोजगारी वाढण्याचा धोका आहे, अशी प्रतिक्रिया उद्योजक सतीश मालू यांनी दिली.
सांगलीतून अमेरिकेला कापड, रेडिमेड गारमेंट्स, ऑटो कम्पोनंट्स, पंप्स-व्हॉल्व्हस्, कास्टिंग, इंजिन प्लास्टिक, इलेक्ट्रिक इक्युपमेंट आदी औद्योगिक उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात. टॅरिफमुळे या क्षेत्रातील उत्पादन व गुंतवणुकीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.