
सांगली : जिल्ह्यात काल दुपारपासून सुरू असलेली संततधार आज दिवसभर कायम राहिली असून ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोयना व चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली.
शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळंकी (ता. मिरज) येथे प्रत्येकी ९०.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आदी तालुक्यांतील अनेक जिल्हा मार्गांवर ओढ्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तासगाव मिरज, तासगाव आटपाडी (भिवघाटमार्गे), हिंगणगाव कवठेमहांकाळ आदी रस्त्यांसह मणेराजुरी पुलावरून तासगाव कवठेमहांकाळ हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील विटा-पारे, बलवडी खालसा खरसुंडी, मोही खानापूर, गोरेवाडी बलवडी हे मार्ग पाण्यामुळे बंद झाले आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांवर एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले असून विस्तारित भागातील नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आनंदनगर परिसरातील तुंबलेला नाला साफ करून मार्ग खुला केला, तर विश्रामबाग परिसरात झाड पडल्याने धामणी मार्गावरील वाहतूक व वीजपुरवठा खंडित झाला. जैन मंदिराजवळील जुनी इमारत पावसाने कोसळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, कोयना धरणातून आज दुपारी दोन वाजल्यापासून सहा वक्र दरवाजांतून १८ हजार ७६४ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चांदोली धरणातून सव्वा वाजल्यापासून वक्र दरवाजाद्वारे ३ हजार ४७९ व पायथा विद्युतगृहातून १६३० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. यामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे जलसंपदा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.