
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हद्दीत डायमंड हॉटेलजवळ पोलीसांनी छापा टाकून कारमध्ये विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली. या कारवाईत २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी काल दुपारच्या सुमारास कारवाई केली. आरोपी दत्तात्रय कृष्णात पाटील (रा. वाकी वसाहत, सांगाव, ता. कागल) हा सिल्वर रंगाच्या वोक्सवॅगन पोलो कार (MH-03-BJ-2893) मधून विनापरवाना पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डायमंड हॉटेल परिसरात सापळा रचला. त्याला अडवून तपासणी केली असता कारमध्ये ५० हजार २०० रुपयांची गावठी पिस्तुल आणि एक जिवंत राउंड, तसेच २ लाखांची कार आढळून आली.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. धिरजकुमार बच्चु, उपविभागीय अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
या छाप्यात सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती मगदुम, पोलीस अंमलदार इजाज शेख, नितेश कांबळे, संदेश कांबळे, पोवार, शेख, कोरवी, भोईटे यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.