
आनुर ( ता कागल ) : गड-किल्ले बांधणी स्पर्धा ही केवळ एक मनोरंजनात्मक किंवा स्पर्धात्मक क्रिया नसून ती आपल्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेला एक प्रेरणादायी उपक्रम आहे.
इतिहासातील घटनांचा अभ्यास करताना देशभक्ती, मेहनत, नियोजन आणि टीमवर्क यांचे महत्त्व युवा पिढीला ज्ञात व्हावे. स्पर्धेच्या माध्यमातून नवीन पिढीला “स्वराज्य” आणि “स्वाभिमान” या मूल्यांची प्रेरणा मिळावी, गड-किल्ल्यांची जपणूक आणि शिवचरित्राची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने दोस्ती सर्कल फाउंडेशन आनुर ता. कागल जि. कोल्हापूर यांच्या वतीने गड-किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये गावातील आठ संघांनी सहभाग नोंदवू आपल्या सृजनशीलतेद्वारे इतिहास, परंपरा आणि शिवकालीन वास्तुकलेचे उत्तम दर्शन घडवले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्यराज परीट, संचित कापडे, सानिका कांबळे, काजल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनवलेला सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती, द्वितीय क्रमांक समर शिंदे, प्रणव गुरव, साहिल चौगुले, आरव लंबे, अनुष्का पाटील व सहकारी यांनी बनवलेल्या राजगड किल्ल्याची प्रतिकृती तसेच तृतीय क्रमांक आदर्श खोत व पूजा खोत यांनी बनवलेल्या प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती यांचा आला.
स्पर्धेचे परीक्षण दोस्ती सर्कल फाउंडेशनच्या सर्व सदस्य व गावातील इतिहास जाणकार व्यक्तींनी मिळून केले. पुढील वर्षी म्हणजे सण 2026 ला गडकिल्ले बांधणीच्या मोठ्या प्रमाणात भव्य स्पर्धा विविध गटामध्ये घेण्यात येतील असे दोस्ती सर्कल फाउंडेशन च्या वतीने घोषित करण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दोस्ती सर्कल फाउंडेशनचे सदस्य प्रज्योत माने, सोमशेखर पाटील, राजकिरण सावडकर, राजेंद्र वागळे, संकेत माने, धीरज साठे, रणजीत सावडकर, दत्तात्रय गुरव, आदर्श माने, प्रणित माने, पांडुरंग रेडेकर, तेजस रेडेकर त्यांच्यासह गावातील शिवभक्त यांनी सहकार्य केले.