
नवी दिल्ली : मतदार याद्यांमधील अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (Special Intensive Revision – SIR) चा दुसरा टप्पा राबवण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कुमार म्हणाले की, बिहारमध्ये पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात ९० हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर यशस्वी मतदार पडताळणी करण्यात आली असून, कोणतीही तक्रार नोंदली गेली नाही. या यशस्वी अंमलबजावणीचे श्रेय मतदारांच्या सक्रिय सहभागाला जाते, असे ते म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यातील एसआयआर १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाणार आहे. या राज्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
या प्रक्रियेदरम्यान सर्व मतदार याद्या आज मध्यरात्रीपासून गोठवल्या जाणार असून, प्रत्येक मतदाराला बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) कडून युनिक गणन फॉर्म दिला जाईल. मतदारांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची गरज नसून, http://voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून २००२ ते २००४ मधील मतदार यादी स्वतः पडताळता येणार आहे.
१९५१ पासून अशा प्रकारचा एसआयआर आतापर्यंत आठ वेळा राबवण्यात आला आहे. शेवटचा फेरतपासणी उपक्रम २००२ ते २००४ दरम्यान झाला होता. आगामी टप्प्यात मतदार याद्यांमधील डुप्लिकेशन, स्थलांतर आणि मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळून यादी अधिक अचूक करण्यावर भर दिला जाणार आहे.