
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या दोन सराईत आरोपींना सापळा रचून अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पाच देशी बनावटीच्या गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे असा एकूण ३,३२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गोपनीय माहितीनुसार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रमा उदयान कॉलनी, ऑक्सिजन पार्क परिसरात सापळा रचून पथकाने दोन संशयितांना पकडले. त्यांची नावे मलिक सलीम शेख (२५, रा. दत्तनगर, बामणोली) आणि प्रथमेश ऊर्फ पाटया सुरेश पाटोळे (२२, रा. बामणोली) अशी आहेत. त्यांच्या अंगझडतीदरम्यान पाठीवरील सॅकमध्ये पाच गावठी पिस्तुले आणि १२ जिवंत काडतुसे मिळून आली. चौकशीत त्यांनी ही शस्त्रे मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील उमरटी गाव येथील राजेद्रसिंग ऊर्फ गोलुसिंग बडवानीसिंग टकराना याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले.
सदर शस्त्रे विक्रीसाठी सांगलीत आणल्याची माहिती मिळताच दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मलिक शेख हा पूर्वीही अशा स्वरूपाच्या दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
मुख्य आरोपी टकराना याचा शोध मध्यप्रदेशातील वरला पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा व मिरज पोलिसांचे संयुक्त पथक घेत असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.