
कागल ( कोल्हापूर ) : कागल शहरातील कमल अनंत पार्क परिसरात एकाच रात्री चार घरांवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दि. २६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून दि. २७ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत ही घटना घडली. चोरट्यांनी दरवाज्यांची कुलुपे तोडून घरात प्रवेश करत बेडरूममधील तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ४ लाख ६२ हजार किंमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीत लक्ष्मण कांबळे, अझरखान हकिम, विजय कांबळे आणि अनिल गुरव यांच्या घरांचा समावेश आहे. फिर्यादी लक्ष्मण कांबळे यांच्या तक्रारीवरून कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी व कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करीत आहेत.