
कागल (कोल्हापूर ) : कागल ते निढोरी मार्गावरील वड्डवाडी चौकाजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात अजय प्रकाश वायदंडे (वय १९, रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या अशोक लेलँड दुधाच्या टँकरने (क्र. GJ-21-Y-6180) स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. MH-09-GS-6574) ला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम प्रकाश आकुर्डे (वय २९, व्यवसाय सेंट्रीग ठेकेदार, रा. पिंपळगाव खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकरचा चालक सुलेमान तस्लीम खान (रा. महालक्ष्मी कॉलनी, जयसिंगपूर, मूळ रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अजय वायदंडे हे आपल्या मोटरसायकलवरून कामानिमित्त कागलच्या दिशेने जात असताना वड्डवाडी चौकात समोरून येणाऱ्या टॅक्टर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने गाडी घेतली. रस्त्यावरील खड्डा चुकविताना त्याने मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत अजय वायदंडे गंभीर जखमी झाले असून, डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात केली असून तपास कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघातानंतर परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कागल पोलिसांनी टँकर जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.