गोकुळकडून गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू, जिल्ह्यातील कुस्ती संस्कृतीला नवे बळ

Share News

कोल्हापूर : जिल्ह्यातील परंपरागत कुस्ती संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) तर्फे प्रसिद्ध गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली. संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

गोकुळकडून यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ‘गोकुळ केसरी कुस्ती’ स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या, मात्र काही कारणांमुळे मागील काही वर्षांपासून या स्पर्धांना विराम लागला होता. अलीकडे कोल्हापूरातील विविध तालीम संघटना, मल्ल आणि कुस्तीप्रेमी यांनी संघाचे संचालक, नेतेमंडळी व चेअरमन यांची भेट घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. यावर सकारात्मक विचार करून संचालक मंडळाने ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

नवीन स्पर्धा निवडणुकीनंतर लगेचच आयोजित केली जाईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण पिढीला परंपरागत कुस्ती खेळाकडे आकर्षित करून नव्या मल्लांना घडविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कुस्ती हा कोल्हापूरच्या परंपरेचा अविभाज्य भाग असून, गोकुळच्या माध्यमातून या खेळाला नवे बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या निर्णयामुळे कोल्हापूरमध्ये परंपरागत कुस्तीला नवचैतन्य मिळेल आणि तरुण पिढीमध्ये या खेळाविषयी उत्सुकता वाढेल, असा सर्वांच्या मतानुसार विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!