
कागल ( कोल्हापूर ) : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा कागलचा श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुस उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असताना, पोलीस, आरोग्य, महावितरण व नगरपालिका प्रशासनाने उत्तम नियोजन केल्याचे चित्र दिसले. वाहतूक नियंत्रणासाठी मुख्य रस्त्यांवर बारिकेड्स व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला, स्वच्छतेचे पक्के नियोजन करण्यात आले. महावितरण विभागाने दिवाळीपूर्वीच दुरुस्तीची कामे पूर्ण करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित केला.

रविवारी अवकाळी पावसामुळे काही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, मात्र सोमवारी वातावरण खुलल्याने नागरिकांनी उरुसाची मजा घेतली. नगरपालिका आणि उरुस समितीने व्यापाऱ्यांना दिलासा म्हणून कराची संपूर्ण रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला. तेली घराण्याच्या मानाच्या गलेफसह विविध संस्थांनीही गलफ चढवून उत्सव साजरा केला.
उरुस सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे, महावितरणचे उपअभियंता अभयकुमार आळवेकर, शाखा अभियंता अभिजित चव्हाण, नगरपालिका मुख्याधिकारी अजय पाटणकर, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे व अग्निशमन दल यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
