
सिध्दनेर्ली : कर्नाटकमध्ये १ नोव्हेंबर रोजी राज्योत्सव दिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील सीमा भागात मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेच्या तिन्ही गटांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला. यानिमित्ताने बेळगावकडे जाण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना आज सकाळी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर, दूधगंगा नदीच्या पुलाजवळ थांबवले. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
सकाळी सुमारे नऊच्या सुमारास ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, प्रकाश पाटील यांच्यासह एकूण १४ शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. याचवेळी संभाजी भोकरे आणि त्यांच्या सहा कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली. शिवसैनिकांनी मराठी माणसावर अन्याय चालणार नाही, कर्नाटक सरकारचा निषेध असो” अशा घोषणा देत आंदोलन पेटवले.
यानंतर खासदार धैर्यशील माने आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते देखील कर्नाटक हद्दीत जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांनाही अडवले. यावेळी त्यांनी दूधगंगा नदी पुलाजवळ हायवेवर ठिय्या आंदोलन सुरू केले, ज्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. कागल पोलिस तसेच कर्नाटक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शिवसैनिकांनी आपल्या मराठी हक्कासाठी पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानातील नागरिक स्वातंत्र्याचा दाखला देत आम्हाला देशात कुठेही प्रवास करण्याचा आणि वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, तरी कर्नाटकात प्रवेश रोखणे ही दडपशाही आहे, असा निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दोन्ही राज्यांच्या सीमारेषेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. शिवसैनिकांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची तातडीने सुटका करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.