
कागल ( कोल्हापूर ) : कागल शहरातील भारत पेट्रोलपंपामागील बालाजी हाइट्स इमारतीत दुपारच्या वेळेत दोन फ्लॅट्स फोडून सुमारे १३ लाख ५२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ४.०० वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी इमारतीतील फ्लॅट क्रमांक ३०३ (रावसाहेब भास्कर देशमुख, वय ३८) व फ्लॅट क्रमांक २०३ (संतोष अरुण कोगनोळीकर) यांचे मुख्य दरवाज्याचे कडी कोयंडे उचकटून प्रवेश केला. त्यानंतर दोन्ही फ्लॅटमधील बेडरूममध्ये ठेवलेल्या तिजोरीतील लॉकरमधून सोन्याचे दागिने चोरून नेले.

फिर्यादी देशमुख यांच्या फ्लॅटमधून एकूण १४८ ग्रॅम वजनाचे दागिने सोन्याची माळ, नेकलेस, राणी हार, मंगळसूत्र, डॉंगे आणि इतर दागिने असे मिळून सुमारे ११ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला. तर कोगनोळीकर यांच्या फ्लॅटमधून २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यात चेन, अंगठ्या आणि कानातील टॉप्स यांचा समावेश असून, सुमारे १ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला.

अशा प्रकारे दोन्ही फ्लॅटमधून एकूण १६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे १३ लाख ५२ हजार रुपये, चोरट्यांनी लंपास केले आहेत. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रशांत माने पुढील तपास करत आहेत. या घटनांमुळे कागल शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.
