
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) यांच्या वतीने यावर्षीही प्रतिष्ठेची गोकुळ श्री दूध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गोकुळ संलग्न सर्व दूध उत्पादकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.
दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे आणि उत्पादकांचा सन्मान करणे हा उद्देश ठेवून ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. यंदा ही स्पर्धा २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन किंवा सचिव यांच्या सहीसह अर्ज ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत गोकुळच्या बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ आणि ताराबाई पार्क येथील कार्यालयांमध्ये सादर करावेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या म्हशीने किमान १२ लिटर आणि गायीने किमान २० लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे. विजेत्यांना गोकुळ श्री पुरस्कारासह रोख रक्कम, शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
बक्षीस वितरण पुढीलप्रमाणे:
- म्हैस – प्रथम : ३५,०००, द्वितीय : ३०,०००, तृतीय : २५,०००
- गाय – प्रथम : २५,०००, द्वितीय : २०,०००, तृतीय : १५,०००
स्पर्धेबाबतच्या सर्व नियम व अटी प्राथमिक दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या असून, या उपक्रमाद्वारे गोकुळ दूध संघ उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी प्रोत्साहित करत उत्पादकांचा सन्मान ही परंपरा कायम ठेवत आहे.