नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला, सर्व कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू, प्रचारयंत्रणांना वेग

Share News

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केले.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. १८ नोव्हेंबरला छाननी, तर अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज माघारीची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर आणि अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.

या निवडणुकीत एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार असून, सुमारे १३,३५५ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यात पुरुष मतदार ५३.७९ लाख, महिला मतदार ५३.२२ लाख आणि इतर ७७५ मतदार आहेत.

राज्यातील ३,८२० प्रभागांतून एकूण ६,८५९ जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी महिलांसाठी ३,४९२, अनुसूचित जातींसाठी ८९५, अनुसूचित जमातींसाठी ३३८ आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी १,८२१ जागा आरक्षित आहेत.

विभागनिहाय पाहता, पुणे विभागात सर्वाधिक ६० नगरपालिका व नगरपंचायती, त्यापाठोपाठ कोकण विभागात २७, नाशिक विभागात ४९, छत्रपती संभाजीनगर विभागात ५२, अमरावती विभागात ४५ आणि नागपूर विभागात ५५ संस्था निवडणुकीसाठी सज्ज आहेत.

सांगली जिल्ह्यात आष्टा, आटपाडी, इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा, तासगाव आणि विटा, तर कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, अमरावती आणि नागपूरसह सर्व जिल्ह्यांतील प्रमुख नगरपरिषदांत मतदान होणार आहे.

राज्यातील सर्व निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता तत्काळ लागू झाली असून, आयोगाने मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुकांमध्ये EVM यंत्रांचा वापर होणार असला तरी VVPAT प्रणाली वापरण्यात येणार नाही.

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमुळे सर्व पक्षांनी प्रचारयंत्रणा सज्ज केल्या आहेत. स्थानिक स्तरावर गटबाजी, उमेदवारीचे गणित आणि आघाड्या–महाआघाड्यांची चर्चा रंगू लागली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून डिसेंबरमध्ये महाराष्ट्राचे राजकीय तापमान चांगलेच वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!