खाऊ गल्ली परिसरात बेशिस्त पार्किंगवर पोलिसांची धडक मोहीम,७० वाहनांवर ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई; ५० हजार रुपयांचा दंड आकारला, पुढील काळातही मोहीम तीव्र होणार

Share News

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खाऊ गल्ली परिसर तसेच विविध चौकांमध्ये अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल ७० वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये ई चलनद्वारे कारवाई करून सुमारे ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला.

पितळी गणपती चौक, धैर्यप्रसाद चौक, शाहू टोलनाका खाऊ गल्ली, खासबाग मैदान परिसर, गोल्ड जिम, वेस्टसाईड मॉल, डी.वाय. पाटील मॉल, गोखले कॉलेज चौक आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी दररोज सायंकाळपासून उशिरापर्यंत अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या व दुकाने सुरु असतात. काही वाहनधारक बेशिस्तपणे दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती.

पोलिसांनी अनेक वेळा सूचना देऊनही काही वाहनचालकांनी दुर्लक्ष केल्याने अखेर कठोर कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखेकडून क्रेनसह पथके तयार करून जागोजागी वाहन हटविण्यात आली आणि ई चलनद्वारे दंड आकारण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वात, सहाय्यक पोलिस निरीक्षक मात्रे व पोलिस अंमलदारांच्या पथकाने केली.

वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, खाऊ गल्ली परिसरासह गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्क करताना रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा बेशिस्त पार्किंग, डबल पार्किंग आणि रस्ता अडविणाऱ्या वाहनांवर पुढील काळात अधिक व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!