
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या कसबा बावडा मार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडून महत्त्वाचे नियमन आदेश जारी करण्यात आले आहेत. सीपीआर चौक ते जैन बोर्डिंग या मार्गावर सर्व प्रकारच्या चारचाकी, रिक्षा, टेम्पो आणि जड वाहनांसाठी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. तसेच राजहंस प्रिटींग प्रेस ते महावीर कॉलेज चौक या मार्गावर सम-विषम पद्धतीने चारचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सम तारखांना पूर्व बाजूस आणि विषम तारखांना पश्चिम बाजूस वाहन पार्किंगची परवानगी राहील. दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते सीपीआर चौक या मार्गावरून खडी, वाळू, स्लॅब वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. हे नियम १० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून नागरिकांनी वाहतूक नियोजनात सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.