
कोल्हापूर : आमदार अमल महाडिक यांनी शासकीय औद्योगिक केंद्र अर्थात आयटीआय ला भेट देऊन पाहणी केली. आयटीआय मध्ये सुरू करण्यात येणारे अल्पमुदत अभ्यासक्रम आणि नव्याने सुरू होणारे पूर्णवेळ व्यवसाय अभ्यासक्रम यासाठी आवश्यक यंत्रसामग्री मनुष्यबळ आणि इतर गरजांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्य आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणेचे सहसंचालक सी.जी ढेकणे यांच्यासमवेत बैठक घेतली.
यावेळी आमदार महाडिक यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे सुरू असलेल्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी केल्या.

आयटीआय मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रभावी जाहिरात करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश आमदार अमल महाडिक यांनी दिले. विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र आयटीआय सुरू करण्याचा मानस यावेळी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. यासाठी लवकरच मंत्रिमहोदयांसोबत बैठक घेण्याचे सुतोवाचही महाडिक यांनी केले.आयटीआय मधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचे आश्वासन आमदार महाडिक यांनी दिले.आयटीआय मध्ये अद्ययावत यंत्रशाळा तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. रिक्त पदे भरण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे अभिवचन आमदार महाडिक यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये नव्या युगाला सामोरे जाणारे उद्योजक घडवले जावेत अशी अपेक्षा आमदार महाडिक यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम एस आवटे यांच्यासह अन्य मान्यवर आणि प्राध्यापक उपस्थित होते.