
उजाळाईवडी : (ता. करवीर) येथे क्रिकेट खेळत असताना घराच्या छपरावर गेलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा उच्चदाब विद्युत तारांचा धक्का बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मोहमद अफाण महंमद असिफ बागवान (रा. विमानतळ रोड, उजाळाईवडी) हा आपल्या मित्रांसह खेळत असताना हणमंत मल्लिकार्जुन खांडेकर यांच्या घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी स्लॅबवरील टोपीवर चढला. छताच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावर असलेल्या उच्चदाब तारांचा स्पर्श होताच त्याला जोरदार विद्युत धक्का बसला आणि तो बेशुद्ध स्थितीत खाली पडला.
त्वरित खाजगी ॲम्ब्युलन्सने त्याला सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.