
कागल : कागल निढोरी राज्य मार्गावरील व्हन्नूर (ता. कागल) येथील खोत मळ्याशेजारील धोकादायक वळणावर आज पहाटे बकरीवाहू ट्रक पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. राजस्थानहून कर्नाटकाकडे जाणारा भारत बेंझ ट्रक पहाटे साडेचारच्या सुमारास उलटला. ट्रकमध्ये तीन कप्यात तब्बल २२० बकऱ्यांची दाटीवाटीची वाहतूक होत होती. वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगत पलटी होऊन २०० बकऱ्यांचा जागीच चेंगरून मृत्यू झाला, तर सुमारे २० बकऱ्या बचावल्या.

ट्रकचालक आणि क्लिनरसह चौघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचार दिले जात आहेत. वाहनचालकांच्या माहितीवरून कागल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला. ट्रक आणि बकऱ्यांचे मिळून लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत बकऱ्यांना शेंडूर येथे पुरून विल्हेवाट लावली. या ठिकाणी धोकादायक वळण असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.