
मागासवर्गीय संघटनांचे सर्व पदाधिकारी खोटे जातीचे दाखले वापरून आरक्षण लाटणाऱ्यांच्या विरोधात उभा करणार महालढा. ..
मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश करणार- पॅंथर शिवाजीराव कवाळे
उत्तमदादा कांबळे यांच्या पुढाकारातून सर्व मागासवर्गीय समाजाचे पक्ष- संघटनांचे नेते, पदाधिकारी एका बॅनरखाली आले एकत्र.
कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आपला आरक्षणाचा घटनात्मक हक्क संपवला जातोय. त्याची कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उदाहरणे समोर येत आहेत. हे पाहून त्या विरोधात. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजे यांच्या पुरोगामी कोल्हापुरात मूळ एससी अर्थात मागासवर्गीय समाजाच्या सर्व पक्ष- संघटना- संस्था यांचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांची बैठक हॉटेल रेडियंट या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष (आ) गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पॅंथर चळवळीतील नेते शिवाजीराव कवाळे होते.
पूर्वीपासून तुच्छ समजल्या जाणाऱ्या मागासवर्गीयांना छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आरक्षणाची तरतूद निर्माण झाली व या मागासवर्गीय समाजाने राजकीय-सामाजिक -शैक्षणिक- आर्थिक -औद्योगिक क्षेत्रामध्ये भरीव प्रगती केली.हे करत असताना अलीकडे याच आरक्षणाचा फायदा- स्वतःला उच्चभ्रू समजणारे, उच्च जातीतले लोक घेताना दिसत आहेत. याची कोल्हापूर नगरीत उदाहरणे देखील आढळून आली आहेत की, त्यांनी मूळ मागासवर्गीयांना बाजूला ठेवले व खोटे जातीचे दाखले काढून राजकारणासाठी कागदावर कधी ओबीसी तर कधी एससी होऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतली. त्याला प्रशासन व सत्तेतील राजकारण्यांनी पाठीशी घातले व मूळ मागासवर्गीयांना बाजूला ठेवले. हे लक्षात येताच या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी त्याची पूर्ण माहिती घेऊन मूळ मागासवर्गीय असणाऱ्या सर्व जातीसमूहांच्या प्रमुख पदाधिकारी यांना एकत्र करून त्या विरोधात लढण्यासाठी आवाहन केले. व शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहिले.
या बैठकीचे प्रास्ताविक करत असताना उत्तम कांबळे म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे आमच्या जगण्याचं कवच कुंडल आहे आणि त्या कवच कुंडलाचा फायदा स्वतःला उच्चभ्रू समजणारे घेत आहेत. हे कवच कुंडल जर भविष्यकाळात त्यांच्याच अंगावरती राहील तर भावी पिढीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण एकसंघ होऊन लढणं, आपली जात आणि पक्ष बाजूला ठेवून मागासवर्गीय म्हणून लढणं ही काळाची गरज आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक दुर्वासबापू कदम म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला लढण्याचं आणि जगण्याचं बळ दिलं. हेच बळ आज उच्चवर्णीय म्हणणारा समाज राजकीय दबावातून घेताना दिसतोय. पैशाच्या मदतीने घेताना दिसतोय आणि म्हणून या विरोधात आपण लढलो तरच आपलं अस्तित्व राहील अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही.
महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, शिका- संघटित व्हा- संघर्ष करा. हा संदेश भीमशक्तीचा आहे आणि हीच शक्ती आता सर्व मागासवर्गीय समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी चर्मकार समाज संघटित होऊन या लढ्यात उतरेल.
जनशक्ती महासंघाचे संस्थापक डी.जी. भास्कर म्हणाले, जात म्हणून समाज एकत्र येतो पण आता मागासवर्गीय म्हणून हे सगळे एकत्र आले याचा आनंद आहेच पण ही लढाई सर्वांची आहे. हे काळजीपूर्वक ध्यानात घेऊन लढल्याशिवाय या लढ्याला यश येणार नाही. यासाठी सर्व मागासवर्गीयांनी पूर्ण ताकदिने या लढ्यात उतरावं.
प्रा.शहाजी कांबळे म्हणाले, गेली अनेक वर्ष सामाजिक न्यायासाठी आम्ही संघर्ष करीत आलो आहोत.आता आधुनिक युगात मदमस्त असणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात उभा राहण्यासाठी आपण सज्ज राहूया व ही लढाई जिंकूया.
ब्लॅक पॅंथर पक्षाचे सुभाष देसाई म्हणाले, जातीचे खोटे दाखले काढून घटनात्मक अधिकार जर हिरावून घेणार असतील तर आमचं काय होणार ? हा प्रश्न समाजाला पडला पाहिजे आणि समाजाने एकदिलाने लढलं पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड म्हणाले, या कायदेशीर लढाईसाठी एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत जाऊन याला कायदेशीररित्या ताकद देण्याचे काम आम्ही निश्चितपणाने करू.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख विशाल देवकुळे म्हणाले, नेतृत्व करण्याची धमक असून देखील मागासवर्गीय म्हणून प्रस्थापित आम्हाला पाठीमागे खेचतोय. हे होत असताना आज सर्व मागासवर्गीय म्हणून आपण एकत्र आलो याचा मनस्वी आनंद आहे. तो आनंद भविष्यकाळात भावी पिढीला मिळवून देण्यासाठी आम्ही कोणत्याही लढाईत संघर्ष करण्यासाठी ताकतीने येऊ.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिवाजीराव कवाळे म्हणाले, आंबेडकरवाद्यांची चळवळ ही न्याय अन्यायासाठी खूप महत्त्वाची आहे. पॅंथर चळवळीत काम करत असताना ती मी जवळून पाहिलेली आहे आणि आम्ही सगळे मागासवर्गीय हे पॅंथर आहोत. तो पॅंथर या लढाईसाठी निश्चितपणाने डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. कोणतेही सहकार्य या लढ्यासाठी लागले तर या चळवळीचा मार्गदर्शक म्हणून मी खंबीरपणाने पाठीशी उभा आहे. या पाठीमागं आम्ही मोर्चे आंदोलने आणि अनेक प्रस्थापित आमदार -खासदारांना घाम फोडला आणि त्यांना भीती दाखवली याचे एकमेव कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान. या संविधानाने दिलेला आमचा अधिकार जर कोणी हिरावून घेणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांचा आम्ही परदाफाश करू.या बैठकीचे उत्तम आणि नेटकं व काळाची गरज ओळखून ज्यांनी नियोजन केलं त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांचे सर्व मागासवर्गीय समाजाच्या पक्ष- संघटनांच्या पदाधिकारी नेत्यांनी अभिनंदन केले व आभार देखील मांनले. या बैठकीमध्ये भाकपचे कॉम्रेड रघुनाथ कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जनार्दन गायकवाड, अरुण सोनवणे, डॉ. रवींद्र मोरे, प्रमोद कदम, भीमशक्ती संघटनेचे सुनील जावळे, गवइ गटाचे पांडुरंग कांबळे, दलित महासंघाचे बाळासाहेब माने, जयवंत वडर, शिवसेनेचे संदीप देवकुळे, लोकराज्य जनता पार्टीचे सुरेश जाधव, समता सैनिक दलाचे रमेश जाधव , इब्टा संघटनेचे रघुनाथ मांडरे, जनशक्ती महासंघाचे संदेश माने ,जयसिंग जाधव ,भाऊसो काळे यासहित शेकडो प्रमुख नेते व कार्यकर्ते सहभागी झाले. या बैठकीचे स्वागत वैभव प्रधान यांनी केले. तर कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी आभार मानले.