
कागल (जि. कोल्हापूर ) : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कागल येथील वाहन तपासणी नाका हा अपघातांचे केंद्र बनत चालल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नाका सुरू झाल्यापासून वाहतूक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून, राष्ट्रीय महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने अडथळे निर्माण करून असुरक्षित वळणे देण्यात आल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे निवेदन किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर यांनी कागल पोलिसांना दिले या धोकादायक वाहतूक व्यवस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असून अनेक जण जखमी झाले आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकतेच सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी सोनगे (ता. कागल) येथील रामदास रंगराव पाटील यांचा, तसेच बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी हेरले (ता. हातकणंगले) येथील शब्बीर हजरत देसाई यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
सदर तपासणी नाका चालवणाऱ्या अदानी ग्रुप कंपनीच्या व्यवस्थापनाकडून वाहतूक सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे कागल पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सुरक्षित वाहतूक व्यवस्था लागू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी सागर कौंडेकर जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस, रणजीत पाटील तालुका अध्यक्ष किसान काँग्रेस, अमर चौगुले युवाधाही काँग्रेस, अनिल सकपाळ तालुका उपाध्यक्ष, शरद बासकर, राहुल घराळ, शिवाजी पार्ट, वैभव सनगर, अभिषेक कोहेकर यांच्या सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.