
हुपरी : रेदांळ गावाच्या शिवाजीनगर परिसरात जुन्या कौटुंबिक वादातून मामे व आते भावांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. यात गणेश मूर्तिकार रणजीत बाळासो आवळे (वय 36, रा. शिवाजीनगर, रेंदाळ) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात रोहन दिनकर साठे आणि वैभव दिनकर साठे (रा. रेंदाळ, ता. हातकणंगले) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. फिर्यादी रणजीत आवळे हे त्यांच्या शेडसमोर असताना, संशयित आरोपींनी जुन्या वादाच्या रागातून त्यांच्यावर हल्ला केला. रोहन साठे याने लोखंडी कोयत्याने डाव्या खांद्याजवळ मारहाण केली, तर वैभव साठे याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेत रणजीत आवळे स्वतः जखमी झाले असून, त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हुपरी पोलीस करीत आहेत.