
कोल्हापूर दि. 23 : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याकरता कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) चे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून प्रत्येक क्षेत्रात प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी आवश्यक निधी उभा करूया असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यावर्षी ऑक्टोबर मध्ये आयोजित होणाऱ्या कोल्हापूर सीएसआर शिखर परिषदेच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांच्या गरजा, प्राधान्य क्षेत्र व त्याकरता संभाव्य सीएसआर अंतर्गत मदत तसेच निधी अनुषंगाने चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, मित्रचे सीएसआर समन्वयक स्वराद हजरनिस यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील प्राधान्यक्रम ठरवताना या ठिकाणी प्रशस्त स्पोर्ट सेंटर, अमुझमेंट पार्क, आदर्श शाळा, फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, गडकोट किल्ल्यांचे सुशोभीकरण अशा विषयांना महत्त्व देण्यासाठी विचार व्हावा असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध प्राधान्य विषयांचे सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले, शिखर परिषदेअंतर्गत उपस्थित राहणाऱ्या विविध व्यवसायिकांमार्फत सीएसआर अंतर्गत नामांकित उद्योगांसह स्थानिक उद्योगांना जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देता येईल. ही परिषद जिल्ह्यात ऑक्टोबर मध्ये आयोजित करून त्या ठिकाणी संबंधित सर्व विभाग सविस्तर सादरीकरण करून कामांचा प्राधान्यक्रम देतील.
०००००