
सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात सिंगल युज प्लास्टिक विक्री व साठ्यावर मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली. मार्केट यार्ड परिसरातील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर धाड टाकून तब्बल १० टन सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधित व्यापाऱ्याला २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) सहकार्याने करण्यात आली.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या स्पष्ट आदेशानुसार ही कारवाई पार पडली. सतत कारवाई करूनही काही व्यापारी सिंगल युज प्लास्टिकचा वापर व साठा करत आहेत, ही गंभीर बाब आहे. अशा प्रवृत्तीवर फौजदारी कारवाई करूनच पूर्णतः पायबंद घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, अतुल आठवले यांच्यासह स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, गणेश धोतरे, वैभव कुदळे, अंजली कुदळे व विकास कांबळे यांनी सहभाग घेतला.

महापालिका क्षेत्रात सिंगल युज प्लास्टिकच्या गैरवापरावर नियंत्रण आणण्यासाठी ही आतापर्यंतची एक मोठी कारवाई मानली जात आहे. भविष्यात अशा आणखी कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार प्रशासनाने केला आहे.