
कुपवाड : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय परिवहन समिती अंतर्गत एक महत्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. सौ. आशालता अण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाडच्या सभागृहात न्यू प्रायमरी स्कूल, अकलूज प्रायमरी स्कूल आणि आशालता उपाध्ये हायस्कूलच्या रिक्षा व बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस १०० ते १२५ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात वाहतूक नियंत्रण शाखा, मिरज येथील सपोनि सुनील गिडे यांनी शालेय परिवहन समिती स्थापनेमागचा शासनाचा उद्देश, त्याची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल फारुख नालबंद व पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग महात्मे यांनी अल्पवयीन चालकांकडून होणाऱ्या वाहतूक गुन्ह्यांविषयी आणि त्यावरील दंडात्मक कारवाईबाबत उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमादरम्यान पालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, आपल्या पाल्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवण्याची मुभा देऊ नये, तसेच प्रवास करताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर अनिवार्यपणे करावा. शालेय बसेसमध्ये शासन निर्णयानुसार आवश्यक संसाधने – जसे की फर्स्ट एड बॉक्स, फायर एक्सटिंग्विशर आणि योग्य सुरक्षा पद्धती यांची पूर्तता करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.
या बैठकीस आण्णासो उपाध्ये शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. आण्णासो उपाध्ये, न्यू प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे, गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शिरीष भिरणे, पर्यवेक्षक श्री. अनिल चौगुले यांच्यासह तिन्ही शाळांमधील शिक्षक व पालक उपस्थित होते. कुपवाडसाठी वाहतूक पोलीस नियुक्त करण्यासाठी नागरिक व उद्योजकांनी केलेल्या मागणीवरून, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांच्या निर्देशानुसार वाहतूक पोलीसांचे एक पथक शहरात नियुक्त करण्यात आले असून, त्यांनी वाहतूक व्यवस्था आणि शालेय सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला आहे.

हा कार्यक्रम शाळा, पोलीस प्रशासन आणि पालक यांच्यातील समन्वय वृद्धिंगत करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला आहे.