
मिरज : वाहतूक सुरळीत आणि शिस्तबद्ध करण्यासाठी २८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक नियोजन राबवण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी या कालावधीसाठी सुधारित वाहतूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
या नियोजनानुसार फुलारी कॉर्नर ते दत्त चौक हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी (वन वे) करण्यात आला असून, दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे मार्गक्रमण करता येईल.
किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान ते महाराणा प्रताप चौकापर्यंतचा मार्ग देखील एकेरी करण्यात आला असून, दुचाकींव्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अशा वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून जवाहर चौक व किसान चौकमार्गे वळविण्यात येत आहे.
नागरिकांनी या तात्पुरत्या वाहतूक बदलांना सहकार्य करावे, तसेच हरकती किंवा सूचना असल्यास मिरज वाहतूक शाखा किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.