
मिरज : शासनाने निर्बंध केलेल्या सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६ लाख ६१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याच्या पाउचेसह वाहन आणि आयफोनचा समावेश आहे. संकेत शिवाजी चव्हाण (वय २०, रा. फनसोफ हायस्कूलजवळ, रत्नागिरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
या कारवाईत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, आरएमडी पानमसाला, तंबाखू, एम-सेंकेंड टोबॅको यांचे हजारो पाउच व बॉक्स, अंदाजे ४० किलोहून अधिक सुगंधी तंबाखू व गुटखा, तसेच १५ लाखांची महिंद्रा थार चारचाकी आणि १ लाख रुपये किमतीचा आयफोन १६ प्रो मॅक्स असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कामगिरीसाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभागाचे प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गुरव, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश साळुखे, प्रविण यादव, तसेच पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे, सागर कोरे, स्वप्नील भोसले यांचा समावेश होता.
मिरज ग्रामीण पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, बेडग मार्गावरून एक काळ्या रंगाची, नंबर नसलेली थार गाडी गुटख्याचा साठा घेऊन रत्नागिरीकडे जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेडगजवळ सापळा रचून संशयित वाहन थांबवले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये गुटखा व तंबाखूचा साठा आढळून आला. वाहन चालक संकेत चव्हाण याच्याकडे कोणतेही दस्तऐवज नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गुरव हे करीत आहेत.