
कुपवाड : कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या पथकाने श्यामनगर परिसरात धडक कारवाई करत बेकायदेशीररित्या दारू साठवणूक करणाऱ्या महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूंसह गावठी हातभट्टीची दारू असा एकूण ७,४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कविता सचिन नगरकर (वय ३८, रा. श्यामनगर, कुपवाड, ता. मिरज) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजता श्यामनगर येथील पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडच्या आडोशात कविता नगरकर ही महिला संशयितरित्या थांबलेली दिसून आली. पोलिसांनी छापा टाकून तिच्याकडून मॅकडॉल कंपनीच्या १८० एमएलच्या विदेशी दारूच्या बाटल्या (१,७६० रुपये), थ्री एक्स कंपनीच्या ५३ देशी दारूच्या बाटल्या (१,८५५ रुपये), टॅंगो पंच ब्रँडच्या ३० बाटल्या (१,०५० रुपये) तसेच २८ लिटर गावठी हातभट्टीची दारू (२,८०० रुपये, जागीच नष्ट) असा एकूण ७,४६५ रुपयांचा दारू साठा जप्त केला आहे.
ही सर्व दारू आरोपीने विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहे.