
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या दोन महत्वाच्या बाजूला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून बाबूभाई परिख पुलाकडे पाहिले जाते. मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावड्याकडून राजारामपुरी, शाहूपुरीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात परिख पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याभागात दैनंदिन ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने किरकोळ अपघात किंवा सांडपाणी वाहू लागले तरी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्यामुळे याठिकाणी दाभोलकर कॉर्नर ते पाचबंगला परीसरापर्यंत उड्डाणपूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. याबाबत आपला सातत्याने पाठपुरावा असून, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेवतीने राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ ते जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ ला जोडणारा नवा उन्नत उड्डाणपूल बांधण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या पुलाला जोडूनच परीख पुलास नवीन नवीन जोडपूल बांधण्याची मागणी मी ई मेल द्वारे केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांचेकडे केली आहे. याबाबत शासनही सकारात्मक असून, परीख पूल उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम या योजनेअंतर्गत परीखपूल परिसरात कॉन्क्रीट रस्ता व गटर्स करणे या कामास रु.२ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, भौगोलिकदृष्ट्या सखल भागामुळे पुलाखाली चारही बाजूने पाणी येते. त्यामुळे महिनो न् महिने पुलाखालून पाणी वाहत राहते. परिणामी भिंती ओल्या होतात. त्यामुळे या पुलाखालून जाणारे वाहनधारक जीव मुठीत घेऊनच वाहने चालवितात. सध्या पुलाच्या भिंतीही ठिसूळ झाल्या आहेत. पुलाचा स्लॅब गेल्या अनेक वर्षांपासून गळत आहे. पुलाच्या सिंमेट बांधकामाचे ढपले पडत असल्याने पूल कमकुवत होत चालला आहे. पाऊस आणि परिसरातील सांडपाण्यामुळे गटर्स ओव्हर फ्लो झाल्यानंतर पुलाच्या भींती ओल्या होतात. पुलाखालील रस्ताही खचला आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच वाहनधारकांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. वास्तविक पाहता कोल्हापूर शहरात मंजूर करण्यात आलेला नवीन उड्डाणपूल शहराच्या याच मध्यवर्ती भागातून प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपुलास दाभोलकर कॉर्नर ते पाचबंगला परिसरापर्यंत आवश्यक असणारा जोड उड्डाणपूल निर्माण केल्यास शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. तसेच जुन्या परीख पुलाखालून होणारी धोकादायक वाहतूकही बंद होण्यास हा पर्यायी जोडपूल वरदहस्त ठरू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ ते राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या प्रस्तावित कामात दाभोलकर कॉर्नर, कोल्हापूर येथे जोडणारा उड्डाणपूल निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबधित विभागांना देवून सदर उड्डाणपुलाच्या कामास मंजुरी देणेबाबतची मागणी माझ्या पत्राने ई मेलद्वारे दि.२६ मे, २०२५ रोजी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिपक चव्हाण, रमेश पुरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जिल्हा नियोजनचे माजी सदस्य अंकुश निपाणीकर, दुर्गेश लिंग्रस, आझम जमादार, कुलदीप देसाई, देवेंद्र खराडे, अभिजित काशीद, शैलेश पाटील, सुमित साठम आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.