
सांगली : जोगाई प्रिसिजन कंपनीत एका महिला कामगाराचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली असून, कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सदर पीडित महिला जोगाई प्रिसिजन कंपनीतील किचनमध्ये आपला डबा घेण्यासाठी गेली असता, संशयित आरोपी रामचंद्र माने (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याने तिच्या पाठीमागून जाऊन अचानकपणे तिच्याशी गैरवर्तन केले. आरोपीने पीडितेचा हात धरून अंगाशी झोंबाझोंबी करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तू मला आवडतेस, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, असे म्हणत अश्लील शब्दांनी पीडितेची मानसिक छळवणूक केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे घाबरलेल्या पीडित महिलेने त्यावेळी काम सोडून दिले. सततच्या मानसिक तणावामुळे तब्येत बिघडल्याने त्या वेळेस तक्रार दाखल करू शकल्या नव्हत्या. मात्र सध्या तब्येत सुधारल्याने त्यांनी समक्ष पोलिस ठाण्यात हजेरी लावून आपली तक्रार दिली. यावरून कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस करत आहेत.