
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तीणीचा अखेर गुजरातमधील वनतारा प्राणी कल्याण केंद्राकडे रवाना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काल रात्री महादेवीला वनताराच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, या बिदाईने संपूर्ण गावाला हळहळ वाटली.
महादेवी गेल्या 35 वर्षांपासून नांदणी मठाचा अविभाज्य भाग होती. तिची मिरवणूक, धार्मिक विधी आणि ग्रामस्थांशी जडलेली भावनिक नाळ इतकी घट्ट होती की, तिच्या जाण्याच्या बातमीने संपूर्ण पंचक्रोशीत दुःखाची लाट पसरली. मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य केला असला, तरी गावकऱ्यांचे अश्रू, महिलांचे औक्षण आणि महादेवीच्या डोळ्यातले अश्रू या निरोप प्रसंगाला अधिकच भावनिक बनवणारे ठरले.
सोमवारी निशिधी येथून मठात आणल्यानंतर धार्मिक विधी पार पडले आणि गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो नागरिक सहभागी झाले. वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना जमाव आक्रमक झाला आणि दगडफेकीत दोन पोलीस वाहनेही नुकसानग्रस्त झाली. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. अखेर महादेवीला वनताराकडे पाठवण्यात आले आणि गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
ही बिदाई केवळ एका हत्तीणीची नव्हती, ती होती नांदणीच्या भावनिक संस्कृतीची, जिथे महादेवी केवळ प्राणी नव्हती, तर घरातील सदस्य होती. तिच्या भविष्याच्या कल्याणासाठी उचलले गेलेले पाऊल जरी न्यायालयीन आणि कायदेशीर दृष्टिकोनातून योग्य असले, तरी गावकऱ्यांच्या हृदयाला भिडणारे नव्हते.