
कुपवाड : जुन्या वादातून दोघा तरुणांनी एकाला जबर मारहाण केल्याची घटना कुपवाडमध्ये घडली असून कुपवाड औद्योगिक पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सागर राजाराम लोखंडे (वय २९, रा. राम मंदिर जवळ, कवलापूर, ता. मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल उर्फ बाल्या राकेश खाडे आणि विपुल किशोर भोरे (दोघे रा. कवलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोमतेशनगर, पहिली गल्ली, कुपवाड येथे घडली. फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी थांबले असताना आरोपींनी जुन्या वादावरून शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवर जबरदस्तीने बसवून आंबा चौक, चाणक्य चौक मार्गे मेनन पिस्टन चौक येथे नेऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या मारहाणीत सागर लोखंडे स्वतः जखमी झाले असून त्यांनी थेट पोलीस ठाण्यात हजर राहून दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.