
सांगली – काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भवितव्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुधवारी भाजपमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित असल्याच्या चर्चेनंतर आज मुंबईत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी पृथ्वीराज पाटील यांची बैठक झाली. मात्र काही मुद्द्यांवर अजूनही स्पष्टता न झाल्याने त्यांनी अंतिम निर्णय पुढे ढकलल्याचे समजते.
दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने देखील तत्काळ सक्रिय होत पाटील यांच्याशी संपर्क साधला. ‘पक्ष सोडू नका’ असा आग्रह त्यांच्यावर धरला गेला. त्यानंतर आमदार विश्वजीत कदम यांच्याशी पृथ्वीराज पाटील यांची दीर्घ चर्चा झाली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांचे भाजप प्रवेशाचे दरवाजे उघडे असले तरी ते बंदही झालेले नाहीत.
महत्वाचे म्हणजे, केवळ भाजपच नव्हे तर शिंदे गट व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही त्यांना प्रस्ताव मिळाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. गेल्या काही महिन्यांतील स्वकीयांचा विश्वासघात आणि अंतर्गत मतभेद यामुळे पाटील अस्वस्थ असल्याचे जाणवले. त्यामुळे पक्षांतर करणे की पक्षातच राहून आपली व्याप्ती वाढवणे, याबाबत त्यांनी आठ दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सांगलीच्या राजकारणात पृथ्वीराज पाटील यांचा निर्णय निर्णायक ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड हालचाली सुरू आहेत. काँग्रेसमध्ये राहणार की भाजपकडे वळणार? हे पाहणे आता केवळ सांगलीच नव्हे तर राज्यातील राजकीय वर्तुळासाठीही उत्सुकतेचे ठरणार आहे.