
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच गुजरातमधील अमूल डेअरीच्या अत्याधुनिक वासरू संगोपन प्रकल्प व टीएमआर (Total Mixed Ration) चारावीत प्रकल्पास अभ्यासभेट दिली. या भेटीत वासरांचे वैज्ञानिक पद्धतीने संगोपन, योग्य आहार, लसीकरण, स्वच्छता व निगा याबाबत सविस्तर माहिती मिळाली. तसेच, भविष्यात सक्षम व दर्जेदार दुभती जनावरे तयार करण्यासाठी अमूलने राबवलेली प्रक्रिया पाहून गोकुळच्या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. टीएमआर प्रकल्पात प्रथिनयुक्त व संतुलित आहाराचे एकत्र मिश्रण करून जनावरांच्या आरोग्यात सुधारणा व दूध उत्पादनात वाढीचा आदर्श पाहायला मिळाला. यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन चाराव्यवस्थापन अधिक परिणामकारक होते, असेही निरीक्षण नोंदवले गेले. या दौऱ्यानंतर बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, अमूल डेअरीच्या या प्रकल्पांमधून आधुनिकतेचा आदर्श मिळाला असून गोकुळमार्फत अशा योजनांची अंमलबजावणी करून आपल्या भागातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवले जाईल. या अभ्यासदौऱ्यात गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील, अरुणराव डोंगळे, अजित नरके तसेच कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सहभागी झाले होते.